Monday, June 19, 2006

मृगजळ

अतृप्‍त नि:ष्‍प्रेम असे एक वाळवंट,
निघालं मृगवजळाच्‍या शोधात....
भेटलंही त्‍याला एक मृगजळ,
हिरवगार,संपन्‍न........
अगदी आसासून,समरसून.....
आता.................
मृगजळाचं बनलंय वाळवंट,
नि:ष्‍प्रेम,उजाड..........
वाट पाहतंय..............
मृगजळ येईल का कधी परतून.........??

पाचोळा

प्रवाहात पडल्‍यावर,
पाचोळ्‍याचं एक बरं असतं..
दिशाही मिळते,
आणि नशाही.......

बकुळगंध

मला एक सांग आधी......
मातीत पडलेल्‍या बकुळफुलाची,
माती झटकून टाकशील...
मातीला लागलेला बकुळगंध
झटकू शकशील कधी??

पाळंदीवर उमललेली रानफुलं
कोमेजतील,नाहीतर खुडून टाकशील...
चांदण्‍यांची फुलं,
मावळतील कधी??

पाचोळा

आयुष्‍याच्‍या प्रवाहात...
पोहणं कमी,
वाहवणंच जास्‍त....

Sunday, June 18, 2006

पाचोळा

आलो मी एकला,
जाणारही एकला,
एकांत येथला
का न साहे....?

साथ दे....

इतकं प्रेम करु नकोस,
की मी गुदमरुन जाईन....
इतकी आस्‍था दाखवू नकोस,
की मी दबून जाईन....
इतकं हित पाहू नकोस,
की मी दुबळी होईन....
इतकं दान देऊ नकोस,
की मी याचक होईन....
हात दे...मला उभं रहायचंय....
साथ दे...मला बरोबर चालायचंय......

Friday, June 16, 2006

खरे....?

खर्‍याच्‍या मागे धावून धावून,
मन आयुष्‍याला विटते,
आणि तेव्‍हां कुठे त्‍याला,
मृगजळ भेटते.........