Monday, January 29, 2007

पाचोळा

सांज सकाळ,वेळ अवेळ
बासरी सूरवेल्‍हाळ.....

सूर मधाळ, भाव तरल,
कान्‍हा मनवेल्‍हाळ.....

वाट ओढाळ,चित्त नाठाळ
पावले रक्‍तबंबाळ.....

राधा विव्‍हल,नेत्र बोझल
मेघ घनश्‍यामल.....

पाचोळा

काळी वेदना
सावलीत लपली
उजाडल्‍यावर....

डोळ्‍यातलं पाणी
खेळायला गेलं
दवाबरोबर....

फुलांचे नि:श्‍वास
उडून गेले
मारताच फुंकर....

सुगंधाची कुपी
दूरवर उधळली,
हसण्‍याबरोबर....

Sunday, January 28, 2007

पाचोळा

देवाच्‍या पायावर
फुलांची लयलूट,
वेलीपासून ताटातूट....

पाचोळा

टाकीच्‍या घणांनी
घडली मूर्ती..
देवाची आरती....

पाचोळा

रेतीवर तुझ्‍या माझ्‍या
पावलांची नक्षी,
क्षितिजाच्‍या पल्‍याड उडणारे
आठवणींचे पक्षी....
काळ तयारच असतो
पावलांची नक्षी बुजवायला....
इतका वेळ का लागतो मग,
मनाच्‍या जखमा बुजायला??

Wednesday, January 17, 2007

पाचोळा

कुणीतरी आपलं वाटतं,
पण तसं सांगता येत नाही....
त्‍याच्‍याकडे जाणं !....
ते, तर अशक्‍यच!!....
म्‍हणून तर अंतर पडतं,
त्‍याच्‍यात आणि आपल्‍यात.....
.....आभाळाइतकं!!

पाचोळा

दिस नकळत जाई,
सांज रेंगाळून राही,
क्षण एक नाही,
ज्‍याला तुझी आठवण नाही.......

केशरी पखरण
अशा रेंगाळल्‍या क्षणी,
एक घडी रे भेटीची,
तिच्‍या किती आठवणी.........

Sunday, January 14, 2007

आठवण..ओली.

मावळतीच्‍या रंगात न्‍हायलेली,
एक आठवण ओली...
गावच्‍या पाउलवाटेवर,
जोडीने चालणार्‍या दोन सायकली....
वाटेच्‍या कडेला,
झाडात गुंतलेल्‍या आकाशवेली,
अन्‌ भांबावलेली नजर,
एकमेकीत गुरफटलेली....
नजरेनेच वचने किती,
दिली..घेतलेली....
घामेजलेल्‍या तळव्‍यावर,
इवली रानफुले ओली.....
.....
काळाची वाजे टाळी,
वाट झालीसे निराळी..
सांज मावळली..
सारी स्‍वप्‍नेही निमाली....
बिखरली वाट,
सरेना पायातळी...
जुन्‍या चंदनी पेटीत,
रानफुले सुकलेली....
विसरली वाट,
पापणी ओली ओली..
आता दूरस्‍थ जगाची,
ओढ लागली,लागली........

संध्‍या-सागर

निळे जांभळे अति अद्‍भुत अन्‌,
लाल, केशरी,सुवर्णवेष्‍टित..
अर्पुनि अपुले रंग निधीला,
संध्‍याराणी पुजे सागरा....

सागर वदला संध्‍याराणी,
विस्‍मित मी तव रंगपूजेने..
मजसि ओढ परि चंद्रकलेची,
झुरतो तिजप्रति मनोमनी....

संध्‍या वदली मोदभराने,
रे मित्रा,बस्‍स्‌..बघ हासोनी..
इंद्रधनूच्‍या पुलावरोनी,
चंद्रकला येइल उतरोनी....

सागर-चंद्रकलेचे मीलन,
घडवुनी आणी संध्‍याराणी..
रंग आपुल्‍या प्रीतीचे अन्‌
देई जगावरी उधळोनी....

बध्‍द करी जी,कसली प्रीती?
बंधमुक्‍त प्रीती करी..
खर्‍या प्रीतीची अक्षरगाणी,
अजुनी गाते संध्‍याराणी.......

Tuesday, January 02, 2007

पाचोळा

नाती....सारी स्‍वार्थापुरती....
संबंध...दिल्‍या घेतल्‍याचे....
कोणी न थांबे कोणासाठी....
सारे प्रवासी घडीचे.....

पाचोळा

अंतर्यामी निरोप मिळता,
घास हातीच राहिला....
आयुष्‍याच्‍या ताटावरुन,
ज्‍याची वेळ आली,तो उठला......