Tuesday, April 24, 2007

अमल....

निळे आकाश वरती,
निळा सागर खालती,
अशा विशाल शिंपेत,
एक प्रगटला मोती....

उगवत्‍या रविकरें,
झाले आभाळ निरभ्र,
पसरली आभा शुभ्र,
मंगलाची,पवित्रतेची....

एका स्‍मिताच्‍या रेषेने,
पट पांगले तमाचे,
पृथ्‍वीवरी पसरले,
दिव्‍य तेज अमलाचे......

Monday, April 02, 2007

सख्‍या..

पौर्णिमेचा चंद्र आता उगवला गगनात आहे..
खाचखळग्‍यातुनही त्‍याच्‍या हासणे वोसंडताहे....

तू दिलेला मोगर्‍याचा हार काही सांगताहे..
रातराणीच्‍या सुगंधे भारलेला वात आहे....

संगतीला तूही माझ्‍या, हात तव हातात आहे..
वारुणी अन्‌ चांदण्‍याची दुथडी भरुनी वाहताहे....

Sunday, April 01, 2007

नको विचारू...

नको रे असा
हट्‍ट धरूस,
नको विचारूस काही..
नको लावूस
सांगायला,
मनातले सारे काही..

काही सांगताना,
काय लपवायचे
ते कळणार नाही मला..
जे लपवायचे,
तेच नेमके
सांगून बसेन तुला..

काळजाच्‍या कुपीत
बंदिस्‍त असणारे,
मुग्‍ध भाव सारे..
डोळ्‍यातल्‍या
पाण्‍याबरोबर
वाहून जातील ना सारे.....