Thursday, October 04, 2007

लेक माझी..

पहाटेच्‍या रानवार्‍या,
किती उधम करिशी,
त्‍यापरीस धर वाट,
माझ्‍या लेकीच्‍या घराची..
अंगणात पारिजात,
फुललासे पानानिशी,
देते सुगंध जरासा,
तिच्‍या घरला नेण्‍यासी..
नेई जपून, जपून,
ठेव तिच्‍या खिडकीशी,
बघ हळूच,हळूच,
लेक माझी आहे कशी..
जा रे हळू तिच्‍यापाशी,
तिला सांग माझे गूज,
दे रे सुगंध मायेचा,
हातांनी,मोरपिशी..
म्‍हण तिला,सुखी ऐस,
कर सुखी ग सार्‍यांसी,
आणि माझ्‍या ग सयेने,
नको होऊ कासाविशी..
तिच्‍या एका स्‍मरणाने,
मनी लकेर हास्‍याची,
वाणी मधुर तियेची,
रुणझुणे कानापाशी..
तिच्‍या मनाच्‍या कुपीत,
लयलूट सुगंधाची,
तिच्‍या कीर्तीचा सुगंध
आण मला उत्तरासी....

2 Comments:

Blogger sonal m m said...

pratyekveles navyani manala bhavtaat he shabda...these words r the rope of hope which help me swnig swiftly thru the hardships of present and unknown future...

11:58 PM  
Blogger sushama said...

minya,tuzyasathich sagla......

1:58 AM  

Post a Comment

<< Home