Saturday, April 11, 2009

share...

A joy does not become real,
until you share it,
with someone dear..
A joy, so small,
like blooming of a May-flower,
or a star blinking for a moment,
and rushing down to the earth...

Share a tear,
and it becomes a dew-drop,
perching on a blade of the green grass..
and blowes the soft wind,
warm and damp, like a breath,
of a waiting lover......

सख्‍या...

आपली, आपली म्‍हणताना,
माणसे दुरावत गेली,
आली, आली म्‍हणताना,
सांज ढळत गेली..

बघता-बघता मातीची,
नाळ तुटत गेली,
घट्‍ट धरलेल्‍या हातातून,
बोटे सुटत गेली..

न कळलेली, नात्‍यांची,
कोडी सुटत गेली,
वरवरची, चमकदार,
बेगड उडत गेली..

तुझी वाट पाहता-पाहता,
पापणी शिणत गेली,
सारा अंधार दाटताना,
आशाही मावळत गेली....

सख्‍या...

हास्‍य जरि ओठात माझ्‍या,
हास्‍य ते ना अंतरी,
जाणिशी ना तू मनीं?...

रंग तू काही दिले,
रंग मी माझे दिले,
परि चित्र ना ते रंगले...

दीप प्रीतीचे सख्‍या रे,
कापरासम क्षणिक जळले,
काही न मागे राहिले...

वाट स्‍वप्‍नांची सुगंधी,
गर्द हिरवी, मखमली,
अन्‌,उमलली प्रीतीफुले...

चालु जाता मी सुखाने,
हाय,हिरवाळीतुनी,
किती डंख पायी लागले...

यातनांनी पोळलेल्‍या,
पावलांना नि मनाला,
प्रेम कधि ना लाभले....

Saturday, September 20, 2008

साखळी हायकू...

साखळी हायकू
मागच्या आठवड्यात संवेदनी काव्यमय खो खो सुरु केला. सागरनी सुमेधाच्या कवितेवर कवितारुपी प्रतिक्रिया धाडली आणि या सगळ्यातून साखळी हायकूची (हाईकूची?) कल्पना तिला सुचली.

"साखळी हायकू"साठी नियम:
१) खाली दिलेल्या सुमेधाच्या हायकूप्रमाणे तीन ओळींचा (की ओळींची?) हायकू रचायचा.
२) त्यातील मात्रा, ताल, ध्वनीरुप तसंच्या तसं आलं तर उत्तम. शक्य तितकं साम्य राखायचा प्रयत्न करायचा.
३) सर्वात महत्त्वाचे, ही साखळी असल्यामुळे तुम्ही जी कडी गुंफणार आहात तिची आधीच्या कडीशी काहीतरी जोडणी असावी : त्यातील लपलेल्या किंवा स्पष्ट दिसणार्‍या अर्थानुसार, त्यातील वापरलेल्या प्रतिमेनुसार, सूचित केलेल्या कल्पनेनुसार किंवा व्यक्‍त होणार्‍या भावनेनुसार किंवा अजून काही असेल!
४) कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन जणांना खो द्यायचा. त्यांच्या ब्लॉगवर त्यांना प्रतिक्रिया देऊन तसं कळवायचं आणि शक्य असल्यास सुमेधाच्या ब्लॉगवर तिला कळवायचं. कळवायचा हेतू इतकाच की ती सगळ्या कड्या एकत्र करू शकेल.
५) तुमच्या नोंदीच्या सुरुवातीला हे नियम डकवा, तुम्ही ज्या कडीच्या पुढे लिहीताय (ज्याच्याकडून/जिच्याकडून खॊ मिळालाय त्याची/तिची कडी) ती कडी उतरवा, आणि शक्यतो तुम्ही ज्यांना खो देताय त्यांच्या ब्लॉगचा दुवा द्या.

मला प्रशांत कडून खो मिळालाय. तो स्वीकारून त्यात माझी कडी ओवण्यापूर्वी सुमेधाच्या हायकूपासून माझ्यापर्यंत आलेली हायकूंची साखळी मी देत आहे. शेवटची हायकू माझी आहे. हायकू या काव्यप्रकाराबद्दल सईने तिच्या ब्लॉगवर छान माहिती दिली आहे. त्याचा उपयोग अवश्य करून घ्यावा.

माझ्यापर्यंत हायकूची साखळी आली आहे ती खालीलप्रमाणे:


रस्त्यातल्या फुलांचा
धुंद गंध दरवळला
मुक्कम तिथेच हरवला!
(इति सुमेधा)
जुन्या शर्टाच्या खिशात सापडली
रस्त्यावरची दोन-चार सुगंधी फुलं
माझ्या खांद्यावर डोकं ठेवून चालली होतीस कधी काळी
(इति चक्रपाणि)
कोमेजलेली फुलं
गंध तसाच कायम तरी
तुझ्या अथांग प्रेमापरी
(प्रशांत)


हायकूच्या या साखळीतली माझी कडी:

जुनं पुस्तक उघडतांच
पडला एक वाळका गुलाब
आता त्या सारखाच प्रेमांत उरला नाही आब

माझा खो मेघनाला अन् सुषमाला Labels: साखळी हायकू

साखळी हायकू ...
ही पुढची माझी कडी..
जुनं...

प्रेम जुनं, पुस्‍तकही जुनं,
जुन्‍या पुस्‍तकासारखं, मनही सुनं,
गंधाच्‍या वाटेवर, जुळतील कां पुन्‍हां, मनं?... सुषमा

sushama-karandikar.blogspot.com
email :-sushamaskarandikar@yahoo.com

आता खो कसा देऊ, ते समजत नाही...सांगा कुणी...सुषमा..

२१-९-०८ :- माझा खो हरेकृष्‍णजी ना...आणि आशा ला...

Wednesday, August 20, 2008

सख्‍या...

अशी चालले मी, किती चालले,
किती दु:ख नेत्रांतुनी वाहिले,
किती श्रान्‍त, भेगाळली पाउले रे,
अजूनी किती चालणे राहिले..?

धरोनी तुझा हात हाती सख्‍या रे,
जणू पुष्‍पशय्‍येवरी चालले,
अचानक परि, स्‍वप्‍न ते भंगले अन्‌,
वाट्‍यास आले जिणे एकले..

संगीत ते नर्म ओठातले अन्‌,
ते भाव डोळ्‍यातले कोवळे,
किती मी स्‍मरू, अन्‌ कसे विस्‍मरू,
सख्‍या चित्र जे अंतरी कोरले..?

तिथे, पार त्‍या, दूर क्षितिजावरी रे,
नभांगण जिथे भूवरी वाकले,
तिथे नीलछायेतळी थांब प्रीतम,
निळे स्‍वप्‍न नेत्रांत सांभाळिले....

Monday, July 21, 2008

सख्‍या...

जाहले, जे घडुनी गेले, त्‍यां आठवणे व्‍यर्थ आहे,
चक्र काळाचे पुन्‍हां उलटे फिरविणे, शक्‍य का रे?

मांडलेला डाव, जो उधळून दिधला तू स्‍वहस्‍तें,
त्‍यातली रंगत फिरूनी आणणे तुज शक्‍य का रे?

बांधुनी, कवटाळुनी, जखडून ठेविशी जरि अता रे,
उडुनी गेले कापरासम, रंग नात्‍यातील सारे..

वाळल्‍या कुसुमात शोधिशी रंग बरवा तू अता रे,
रंगही ना, गंधही ना, गळुनी पडले भूवरी रे....

Saturday, July 19, 2008

पुन्‍हां एकदा...

तू दिसलीस गं, दिसलीस तू अन् पुन्हां एकदा,
ओळखीचे स्मित उमलून आले, पुन्हां एकदा..

अंतरात नादल्या सतारी, दिडदा, दिडदा,
तीच जुनी धून ओठी आली, पुन्हां एकदा..

नाव तुझे जे, मनात जपले, किती-कितीदा,
आज अचानक ओठी आले, पुन्हां एकदा..

पाउलवाटेवरी चाललो, रमलो कितिदा,
तू आलीस, अन् दरवळली बघ, पुन्हां एकदा..

नदीतीरी बसलो जळात सोडून पाय कितीदा,
स्मृतिलहरी झंकारून उठल्या, पुन्हां एकदा..

तुलाही सारे आठवते कां, सांग एकदा,
जगेन पळभर, पुन्हां एकदा, बस्स, एकदा.....

Saturday, July 05, 2008

पावसा...

नको, नको रे पावसा,
आता पुरे कर जोरा,
धर माझा हात, चल,
डोंगराच्या पार जरा...

तिथे टिपूसही नाही,
नुसता वारा हा भरारा,
तिथे पाड तुझ्या धारा,
जरा भिजव झाडोरा...

तेव्हां फुटेल पानोरा,
नवा येईल फुलोरा,
आणि जमिनीची धूप,
थांबेल जरा, जरा...

तेव्हां नद्या वाहतील,
गावतळी भरतील,
जेव्हां भुका भागतील,
तेव्हां हासेल ही धरा....

Friday, June 13, 2008

सखि..

ओळखीचा सूरही का बेसुरा भासे मला?
सूर कंठातीलही सोडून गेलासे मला..
आठवेना शब्‍दही समजावण्‍या तुजला सखे,
गे मूक झाले नेत्र अन्‌, अश्रूच केवळ बोलके..

बघ, वळेसर बकुळीचे गुंफीत बसलो मी सखे,
अन्‌, कल्‍पनेतच माळिले केसांत तुझिया लाडके..
पाहुनी तव लाजणे, गे स्‍वप्‍न झाले बोलके,
अन्‌, वाढवेळी भान येतां, धावलो तुजप्रति सखे..

परि वेळ टळली भेटीची, हे चांदणे झाले फिके,
अन्‌, भोवताली पसरले बघ गर्द रुसव्‍याचे धुके..
सोड ना रुसवा प्रिये, करु तरी किती मी आर्जवे?
हे दंव नव्‍हे पात्‍यांवरी सखि, सांडली मम आसवे..

मग, टाकुनी रुसवा प्रिया अशी मंद गाली हासली,
शब्‍दां-सुरांच्‍या संगतीने पाखरेही थिरकली..
एक कविता प्रीतीची, मग उमलली कलिकांसवे,
अन्‌ दंवाच्‍या संगती, गेली विरोनी आसवे....