Friday, June 13, 2008

सखि..

ओळखीचा सूरही का बेसुरा भासे मला?
सूर कंठातीलही सोडून गेलासे मला..
आठवेना शब्‍दही समजावण्‍या तुजला सखे,
गे मूक झाले नेत्र अन्‌, अश्रूच केवळ बोलके..

बघ, वळेसर बकुळीचे गुंफीत बसलो मी सखे,
अन्‌, कल्‍पनेतच माळिले केसांत तुझिया लाडके..
पाहुनी तव लाजणे, गे स्‍वप्‍न झाले बोलके,
अन्‌, वाढवेळी भान येतां, धावलो तुजप्रति सखे..

परि वेळ टळली भेटीची, हे चांदणे झाले फिके,
अन्‌, भोवताली पसरले बघ गर्द रुसव्‍याचे धुके..
सोड ना रुसवा प्रिये, करु तरी किती मी आर्जवे?
हे दंव नव्‍हे पात्‍यांवरी सखि, सांडली मम आसवे..

मग, टाकुनी रुसवा प्रिया अशी मंद गाली हासली,
शब्‍दां-सुरांच्‍या संगतीने पाखरेही थिरकली..
एक कविता प्रीतीची, मग उमलली कलिकांसवे,
अन्‌ दंवाच्‍या संगती, गेली विरोनी आसवे....

0 Comments:

Post a Comment

<< Home