Wednesday, August 29, 2007

कावळेदादा..

रविवारच्‍या सुटीचा घोळ फारच बाई,
उशिरा उठणी,पेपर,खाणी,काही आवरतच नाही..
बारानंतर होऊन गेली स्‍वैपाकाची घाई,
एकीकडे भाजी-आमटी,एकीकडे कुकरची शिट्‍टी..
एक पोळी तव्‍यावरती,एक पोळपाटावरती,
तेवढ्‍यात वाजली खर्रर्कन्‌ दारावरची घंटी..
स्‍वैपाक सोडून आता कोण दार उघडेल बाई?
टीव्‍ही सोडून उठायला कोणी तयार नाही..
तेवढ्‍यात वाजली बेल वाजली परत-परत,
दार उघडायला मग गेले धावत-पळत..
दारात उभा होता माझा दोस्‍त कावळेदादा,
रोड दिसला थोडा, थोडा होता उदासवाणा..
रुसलास का रे कावळेभाऊ? हल्‍ली येत नाहीस,
तिरपी मान करुन माझ्‍याकडे पोळी मागत नाहीस..
बाळे माझी जेवता-जेवता तुझ्‍याशी गप्‍पा मारत,
एक घास चिऊताईला,एक तुलाही देत..
हो ग ताई,काय सांगू,आमची अडचण बाई?
घरटं करायला,सावलीला,आम्‍हांला झाडच उरलं नाही..
सोसायटीत,रस्‍त्‍यांवर बघ,झाड नाही कुठेच,
जातो मग जंगलाकडे,राहतो झालं तिथेच!!..
निसर्गप्रेमी आहेस ना? मग प्‍लीज एवढं कर,
बाल्‍कनीत, खिडकीत, गच्‍चीत,दोन तरी झाडं लाव..
रोज येईन मग इथे,बाळघास खाईन,
उडेन,फिरेन,मान उडवेन,तुझ्‍या बाळाला खेळवेन..
वचन देते कावळेदादा,नक्‍की करीन एवढं,
माझ्‍याबरोबर शेजारणीही लावतील दोन-दोन झाडं..
बघता-बघता सोसायटी,गाव होईल हिरवंगार,
मग माझा कावळेदादा उदास नाही राहणार......

Sunday, August 19, 2007

इ टीव्‍ही शीर्षकगीत

स्‍वप्‍न बांधून पंखात,पक्षी पांगला नभात,
धुंद भरारे,थरारे पक्षी अनोख्‍या जगात...

रंग ओळखीचे जरी अनोळखी अंतरंग,
दूर स्‍वप्‍नांच्‍या रंगात झाले क्षितिजही दंग,
खोपा कोणता घेऊन नवी येईल पहाट...

आज आभाळाच्‍या मनीं इंद्रधनूची कमान,
आनंदाच्‍या कमानीला आज सुखाचे तोरण,
धुंद यक्षगान चाले सप्‍तस्‍वरांच्‍या लयीत....

Saturday, August 18, 2007

दिवे...

गूढ अंधारात,
चमकणारे काजवे,
आशेचे दिवे....

बळ....

अंधारात डोकावण्‍यानेच,
बळ मिळते,
प्रकाशाकडे झेपावण्‍याचे....

श्रावण..

टपोर थेंबांची काचेवर नक्षी,
मनाच्‍या वळचणीला आठवणींचे पक्षी..

ओल्‍या अंगणात धारांचा झिम्‍मा,
ओल्‍या मनात आठवणींचा हमामा..

काळ्‍याभोर ढगावर विजेची रेघ,
मनाच्‍या आभाळात आठवणींचे मेघ..

सरत्‍या धारांची अंगणात पागोळ,
मोहनाच्‍या आठवणीनी भरली ओंजळ....

श्रावण..

असा श्रावण श्रावण,
झिरपला माझ्‍या मनीं,
सारे दु:ख उरातले
पाझरले डोळ्‍यातुनी....

मग मनाच्‍या अंगणी,
आनंदाची बरसात,
माझ्‍या प्रसन्‍न हास्‍याला
पारिजाताची संगत....

निळ्‍या-सावळ्‍या ग भाळी,
चांदव्‍याचे गोंदवण,
हारी जिवाची काहिली,
ओल्‍या मातीचे चंदन......

दिवाणा....

अवखळ लाटांचा,
रात्रभर धिंगाणा,
किनारा दिवाणा....

Wednesday, August 08, 2007

चित्‍तरकथा.....

ओढाळ,वेड्‍या लाटांची,
चित्‍तरकथा प्रीतीची,
क्षणिक भेट किनार्‍याची,
पुन्‍हा वाट परतीची......

Wednesday, August 01, 2007

हरि रे....

हरि रे हरि, दु:ख हरी,
हरि रे हरि, क्‍लेष हरी..
हरि रे तव मुरलीच्‍या
स्‍वरलहरी दु:खहारी.....

हरि रे हरि, वेळुवनीं
घुमणारी वंशरी,
रे सुरेल जादुगिरी,
मोहिनी मनावरी.....

श्‍यामवर्ण यमुनेच्‍या
दर्दभर्‍या अंतरी,
हरुनी सर्व दु:ख सख्‍या,
भरुनी टाकी माधुरी.....

हरि, तुझिया मुरलीतुनी
स्‍वरवलये साकारुनी,
दावी तव मूर्त सगुणी,
पाही रे हासुनी.......

सारे काही....

कधी चालताना वाट काटे घुसले पायात,
हाय चटके पायाला,मध्‍यान्‍हीच्‍या तडाख्‍यात..
काट्‍या-चटक्‍यांची तमा कधी बाळगली आहे?
भोगायाचे सारे काही माझे भोगून झाले आहे.....

फुलझेले खुडताना नाग डसले मागून,
ताराफुले वेचताना गेले पंखही जळून..
परि, उडण्‍याची आस कुठे भंगलेली आहे?
भोगायाचे सारे काही माझे भोगून झाले आहे.....

मृत्‍युदेवता येऊ दे माझ्‍या समोर साक्षात,
सात पाउली करीन सात लोक पादाक्रांत..
भार खांद्‍यावरी तिच्‍या सुखेनैव दिला आहे,
भोगण्‍याचे सारे काही माझे भोगून झाले आहे.....

निळ्‍या आसमंती घुमे शांत सागराची गाज,
जणू,स्‍वागत कराया श्रीहरीचे अलगुज..
श्‍याममेघ करुणेचा शिरी बरसत आहे,
भोगायाचे सारे काही माझे भोगून झाले आहे......