Monday, July 21, 2008

सख्‍या...

जाहले, जे घडुनी गेले, त्‍यां आठवणे व्‍यर्थ आहे,
चक्र काळाचे पुन्‍हां उलटे फिरविणे, शक्‍य का रे?

मांडलेला डाव, जो उधळून दिधला तू स्‍वहस्‍तें,
त्‍यातली रंगत फिरूनी आणणे तुज शक्‍य का रे?

बांधुनी, कवटाळुनी, जखडून ठेविशी जरि अता रे,
उडुनी गेले कापरासम, रंग नात्‍यातील सारे..

वाळल्‍या कुसुमात शोधिशी रंग बरवा तू अता रे,
रंगही ना, गंधही ना, गळुनी पडले भूवरी रे....

Saturday, July 19, 2008

पुन्‍हां एकदा...

तू दिसलीस गं, दिसलीस तू अन् पुन्हां एकदा,
ओळखीचे स्मित उमलून आले, पुन्हां एकदा..

अंतरात नादल्या सतारी, दिडदा, दिडदा,
तीच जुनी धून ओठी आली, पुन्हां एकदा..

नाव तुझे जे, मनात जपले, किती-कितीदा,
आज अचानक ओठी आले, पुन्हां एकदा..

पाउलवाटेवरी चाललो, रमलो कितिदा,
तू आलीस, अन् दरवळली बघ, पुन्हां एकदा..

नदीतीरी बसलो जळात सोडून पाय कितीदा,
स्मृतिलहरी झंकारून उठल्या, पुन्हां एकदा..

तुलाही सारे आठवते कां, सांग एकदा,
जगेन पळभर, पुन्हां एकदा, बस्स, एकदा.....

Saturday, July 05, 2008

पावसा...

नको, नको रे पावसा,
आता पुरे कर जोरा,
धर माझा हात, चल,
डोंगराच्या पार जरा...

तिथे टिपूसही नाही,
नुसता वारा हा भरारा,
तिथे पाड तुझ्या धारा,
जरा भिजव झाडोरा...

तेव्हां फुटेल पानोरा,
नवा येईल फुलोरा,
आणि जमिनीची धूप,
थांबेल जरा, जरा...

तेव्हां नद्या वाहतील,
गावतळी भरतील,
जेव्हां भुका भागतील,
तेव्हां हासेल ही धरा....