Saturday, February 23, 2008

उखाणा..

केळीची कमान दारावर,
सनई-चौघड्‍याचा गजर..

कोमल अंगावर हळद ओली,
मोत्‍यांची मुंडावळ हळूच झुलली..

अबोलीची वेणी,जुईचा गजरा,
थोरा-मोठ्‍यांच्‍या कौतुकाच्‍या नजरा..

सावधानच्‍या इशार्‍याबरोबर अक्षतांचा वर्षाव,
कुंकवावरती सुधाकरांचे नाव..

सहजीवनाची सुरेल सुरुवात,
सुधाकरांच्‍या दीपात,सुषमा फुलवात....

Thursday, February 21, 2008

पाचोळा...

मन मरुन गेलंय,
तरी जगावं लागतंय,
छातीत ठोके वाजतायत तोवर...

उखाणा...

रामाच्‍या गं पारी,
सूर्यदेव आले दारी..

दाराशी काढली रांगोळी,
मण्‍या-मोत्‍यांच्‍या ग ओळी..

रांगोळीत लिहिले रामाचे नाव,
रामाच्‍या ठायी सीतेचा भाव..

रांगोळीने रेखले स्‍वस्‍तिक,
थोरा-मोठ्‍यांच्‍या नजरेत कौतिक..

अंगणात बहरला पारिजात,
सुधाकरांच्‍या सहवासात, सुगंधाची बरसात..

उखाणा...

रामाच्‍या गं पारी,
सूर्यदेव आले घरी,
सूर्याचे किरण सोनेरी,
पडलेत माझ्‍या पदरावरी..

साडी नेसलेय चंदेरी,
रंग भरलेत फुलपाखरी,
रंग-बिरंगी साडीला,
काठ शोभती जरतारी..

चमकत्‍या, जरतारी पदरावर,
खुलतोय पिसारा मोराचा,
सुषमा-सुधाकरांच्‍या संसारात,
अक्षय झरा आनंदाचा...

Friday, February 15, 2008

उखाणा...

आला महिना माघाचा,
सूर्यदेवाच्‍या पूजेचा..
सूर्यप्रकाशात रंग सात,
सूर्यदेवाच्‍या रथाला घोडे सात..
सात रंगांची कमान,
आलं देवाचं विमान..
विमान उतरलं अंगणात,
तुळस डोलतेय वृंदावनात..
अंगणामधली उखणली माती,
गायीचे शेण सारवण्‍यासाठी..
गोठ्‍यात गाय, देवांची माय,
गायीच्‍या दुधावर दाट साय..
साय काढली चांदीच्‍या वाटीत,
घेऊन गेले मधल्‍या माडीत..
मधल्‍या माडीत बसलंय कोण?
इकडची स्‍वारी, आणखी कोण?..
तुळशी, तुळशी, आरोग्‍य दे,
सौभाग्‍याचे दान दे..
हळदी-कुंकू वाहते ग,
सुधाकरांचे नाव घेते ग....

Tuesday, February 12, 2008

तेव्‍हांच...

होइल जिवाची घालमेल, खाशील कितिक खस्‍ता,
कडे-खांद्‍यावर बाळाला घेऊन, तुडवशील ऊन-पावसाचा रस्‍ता..
तुझ्‍याच हाडा-मांसाचा तो, जेव्‍हां नाही पुसणार तुला,
तेव्‍हांच तुला समजेल, की काय वाटले असेल मला.....

जिवाचा आटापिटा, रक्‍ताचं पाणी करशील,
आपण ऊन-वारा सोसत, त्‍याच्‍यासाठी सावली बनशील,
जेव्‍हां मोठा होइल, तेव्‍हां जुमानणार नाही तुला,
जेव्‍हां पंख फुटतील, तेव्‍हांच शिंगंही फुटतील त्‍याला,
जन्‍माला घालून मेहेरबानी केलीस, हेच तोही सुनावेल तुला,
तेव्‍हांच तुला समजेल, की काय वाटले असेल मला.....