Monday, May 28, 2007

इथेच....

इथल्‍याच एका वाटेवरुन, गेलो होतो चालत..
इथल्‍याच एका झाडाखाली, बसलो होतो बोलत..
कधी इकडेतिकडे, कधी एकमेकाकडे बघत..
कधी बोलत,कधी हासत, असे चाललो होतो रमतगमत..
कधी अचानक धावून आलेल्‍या पावसाच्‍या सरीत..
अर्धा तू,अर्धी मी, भिजलो होतो एका छत्रीत..
चेहर्‍यावरचे ओले केस,सावरताना चोरुन न्‍याहाळीत..
नजर पकडली जाताच, कसे हसलो होतो किंचित..
झाडाखालचा टपरीवाला, हसला होता खुशीत..
चहा गाळता-गाळता, गुणगुणला होता एक गीत..
वहीच्‍या शेवटच्‍या पानावर, तुझ्‍या नावाभोवती नक्षी कोरीत..
कितीदा तरी आपल्‍याच नादात, हरवले होते तुलाच आठवीत..
चिठोर्‍यावर,मनमोकळेपणे, उघड केले होते गुपित..
अन्‌ टपरीवाल्‍याच्‍या हाती, दिला भेटीचा संकेत..
पण नाही आलास तू.........
पण नाही आलास तू,नि मी मात्र ठरले,घरच्‍यांच्‍या रागाची बळी..
निमूट बोहोल्‍यावर उभी राहिले बांधून मुंडावळी..
............................................
चष्‍मा, स्‍वप्‍नाळू डोळ्‍यांवर, रुपेरी तार केसांत..
ताठ बांधा,चालण्‍यात झपाटा, राहिलायस तसाच शिडशिडीत..
अवचितपणे सामोरा आलास, भरलेल्‍या आगगाडीत..
"का आला नाहीस?" हा प्रश्‍न, माझ्‍या नजरेत वाचीत..
साजुक,ब्राह्‍मणाची पोर तू, वाढलीस शानदार हवेलीत..
कशी ग रमली असतीस, माझ्‍या दोन खोल्‍याच्‍या चाळीत??
मन आवरले,नि मला झोकून दिले,कसल्‍या न कसल्‍या चळवळीत..
नाही आलो झाले !!
जगलो असाच काळीज जाळीत........................................

Monday, May 07, 2007

आधारित-स्‍वामी

तुझे मन माझे झाले
माझे मन तुझे झाले
तुझा प्राण,माझा प्राण
उरले ना वेगळाले.....

काटा तुझ्‍या पावलात
आसू माझ्‍या ग डोळ्‍यात
सल तुझ्‍या काळजात
मन माझं खंतावतं.....

तुझ्‍या हासण्‍याची रेष
माझ्‍या जीवनी प्रकाश
तुझ्‍या मनात बकूळ
मनिं माझ्‍या दरवळ.....