Monday, July 30, 2007

शुक्रतारा....

भेडसावणार्‍या भीतीच्‍या पारंब्‍यांची,
अंधाराच्‍या सावल्‍यांची,
कितीही काळीकुट्‍ट असली जरी,
रात्र ही सरतेच तरी!!
दृढ विश्‍वासाचा,आशेचा धृवतारा,
वाट दाखवतोच खरी.....

मग,स्‍वयंतेजाने प्रकाशतो
दैदिप्‍यमान सूर्यतारा..
झळाळून उठतो आसमंत सारा..
ओढाळ लाटांना मिळतो किनारा..
सारे क्षितिज येते कवेत..
अन्‌,मनोभूमीवर उगवतो,
स्‍वप्‍निल शुक्रतारा.......

पाचोळा....

अवचित पाहिलं,
इकडे तिकडे,
तू मनात डोकावलास ना......

पाचोळा...

स्‍वप्‍नं,जड होतात,
गरीबाच्‍या डोळ्‍यांना,
नि,सांडून जातात.....

मन मोकळं.....

मन मोकळं मोकळं,
अमावास्‍येचं आभाळ,
चंद्रावाचून उजळ,
एकलंसं.....

मन मोकळं मोकळं,
रिती होणारी ओंजळ,
कृष्‍णमेघांची पागोळ,
किती भरू?.....

मन मोकळं मोकळं,
जशी झरते बकूळ,
करी सुखाची शिंपण,
धरेवरी.....

मन मोकळं मोकळं,
जशी पुराणी वाकळ,
धागे रेशमी मायेचे,
देती बळ.......

पाचोळा....

वणव्‍याला घाबरुन,
धावतोय सैरावैरा,
भणाणता रानवारा........