Tuesday, March 30, 2010

वाट....

माडांची मांदियाळी,

विसावलो तरुतळीं,

पायांखाली हुळहुळे,

मऊ वाळू सोनसळी...


वेणीवर माळलेली,

मऊ-मख्मली अबोली,

झळ लागता उन्हाळी,

जरा-जराशी सुकली...


भाळावरती सखीच्या,

नक्षी थेंबांची दाटली,

गडे, धराया सावली,

एक झावळी झुकली...


स्वप्नाचिया मृगजळीं,

लाट उठली, विरली,

वाट माडांच्या मधली,

माडांतच हरवली.....

Monday, March 29, 2010

वाट....

खाचा-खळग्यांची वाट,

एकटीच चालले,

जमीन जास्त भेगाळलेली,

की त्याहून जास्त, पावले?.....

गारूड...

कुंकवाच्या चिरीखाली,

तुझ्या भाळीचं गोंदण,

जेव्हां मधुर हासतं,

तेव्हां माझ्या मनावर

तुझं गारूड पडतं...



तुझं सोन्याचं कंकण,

गर्द हिरव्या चुड्याशी,

जेव्हां गुंजन करतं,

तेव्हां माझ्या मनावर

तुझं गारूड पडतं...



तुझ्या डोळ्यातलं तेज,

नथीतल्या मोतियाशी,

जेव्हां स्पर्धा गं करतं,

तेव्हां माझ्या मनावर

तुझं गारूड पडतं...



तुझी शांत नेत्रज्योत,

जेव्हां निरांजनासवें,

सखे, तेवे गं निवांत,

तेव्हां माझ्या मनावर

तुझं गारूड पडतं.....

Saturday, March 20, 2010

सखे...

रुसुनी तू गेलीस तेव्हां, जलधार कोसळत होती,

अपमानित नेत्रीं माझ्या, आसवेही तरळत होती..



दूर दूर रस्त्यावरती झाडेही निथळत होती,

अन स्वप्नांची रांगोळी, पाण्यात विरघळत होती....




अन तीव्र लहर वाऱ्याची छेडिता पारिजाताला,

शाल शुभ्र, खांद्यावरुनी, हळुवार ओघळत होती....




घनगर्द, सांवळ्या मेघां, बिजलीने कातरताना,

वेदनाच जणू मेघाची, जलरुपीं कोसळत होती....




माझ्याही मनांतरी सखये, अशी स्मृतिवृष्टी होताना,

दूरात मनाच्या क्षितिजीं, चंद्रकोर उजळत होती....

Friday, March 19, 2010

वळवाचा पाऊस...

वळवाचा पाऊस बरसला, जरा जरासा..

ढगाआडचा सूर्यही भिजला, जरा जरासा..

जरतारी अंगरखा भिजला, जरा जरासा..

उडे पितांबर वारयावरती जरा जरासा....



माथ्यावरचा पदरही भिजला, जरा जरासा..

कुरळ कुंतला वारा उडवी, जरा जरासा..

भांगातील सिंदूर विखरला, जरा जरासा..

मावळतीच्या भाळी रक्तिमा, जरा जरासा....



पक्ष्यांचा कलरवही वाढला, जरा जरासा..

सजणाला का उशीर जाहला, जरा जरासा..

नदीपात्राचा धूरट आरसा, जरा जरासा..

रात निरखिते रूपचंद्रमा, जरा जरासा...