Tuesday, June 14, 2011

सख्या...

माझ्या मनाचं पाखरू,
गेलं आभाळाच्या वरी,
किती मनवलं तरी,
तुझ्याशिवाय राहिना...

दूर क्षितिजावरती,
मिळे आभाळा धरती,
तशी तुझ्यावर प्रीती,
माझ्या मनात माईना...

केतकीच्या बनामधी,
जसं नादे अलगूज,
माझ्या मनातलं गूज,
कसं तुला रे कळंना...

माझ्या ओठावर गीत,
माझ्या मनामधी प्रीत,
माझ्या मनाचा तू मीत,
कसं तुला समजंना.....

सख्या...

एक तुझी नजर,
एक माझी नजर,
विसर नजरेतला बहर,
आतातरी...

एक तुझी बोली,
एक माझी बोली,
विसर प्रीती अबोली,
आतातरी...

एक तुझं गीत,
एक माझं गीत,
विसर तुझी-माझी प्रीत,
आतातरी.....

Friday, May 27, 2011

कथा...

नेत्र भिडता नेत्रांना, माझी नजर झुकली,

पापण्यांच्या उंबऱ्याला, माझी नजर अडली,

हलक्याशा हासण्याने, एक लहर उठली,

मूक नथीवर माझ्या, तुझी नजर अडली...


विचारिते काहीबाही, भिवयांची धनुकली,

माझ्या नजरेने गूजें, किती किती सांगितली,

ओठांच्या महिरपीवर, तुझी फिरतां अंगुली,

फिरून एक लाट, मनामधि आंदोळली...


फिरून एकवार, लाट प्रीतीची उठली,

तुझ्या ओठीच्या वेणूत, नवी गीते झंकारली,

मंद झुळूक खट्याळ, रानोवनीं लहरली,

कथा अलवार प्रीतीची, पानापानांत कोरली.....

Tuesday, August 03, 2010

अंगाईगीत...

मीट ना गं डोळे, जागी का अजुनी?

मीट ना गं डोळे जागी का अजुनी..

स्वप्न पाहशी का जागुनी जागुनी....


लटकती मोर, राघू, चिऊ, मैना,

मंद झुलतो गं, चंदनी पाळणा,

शाल उबदार घेई पांघरोनी..

मीट ना गं डोळे, जागी का अजुनी...


नाजुक घागऱ्या चांदीच्या पैंजणा,

नाचविशी पाय नाद आला पुन्हां,

नीज गे जराशी, दमलीस राणी..

मीट ना गं डोळे, जागी का अजुनी...


शांत आकाशात चांदण्यांची दाटी,

पऱ्याही खेळती चांदोबाभोवती,

स्वप्नांच्या राज्यात तूही ये फिरूनी..

मीट ना गं डोळे, जागी का अजुनी....


(चाल: निघालो घेऊन दत्ताची पालखी-अजित कडकडे)

अंगाई...

आनंदाच्या गं झाडाला,
नवी फुटली डहाळी,
तिच्यावर उमलली,
रूपकळी...


गोरुली, गोडुली,
माया-स्नेहाने माखली,
नजरेच्या पाळण्यात,
विसावली...


बघता-बघता,
सई हसाया लागली,
गालावर उमटली,
गोड खळी...


इवलीशी झोळी,
फुलां-फुग्यांनी सजली,
तिच्यामध्ये विसावली,
सोनकळी...

उगवली सांजवेळी,
साजरीशी दीपकळी,
भरो साऱ्यांचीच झोळी,
प्रकाशाने...


किती किती बोलवाल,
तिला छकुली, सोनुली,
नाव द्या ना छानदार,
शुभ वेळी...

आता यावे गं आत्याने,
नाव कानात सांगावे,
शुभ आशीर्वच द्यावे,
पणजीने.....

Friday, April 16, 2010

सख्या...

नाव कोरले नक्षीत,

लाली रंगली रेषांत,

रूप भरले मनात,

मेंदी रंगे तळव्यात....



स्वप्न तरळे नेत्रांत,

तुझी प्रतिमा चित्रात,

लाज लाजते मनात,

गालावरच्या खळीत....



सखा येतसे स्वप्नात,

स्वप्नातल्या कहाणीत,

कधी येशी रे सत्यात?

प्राण साठले डोळ्यात.....

Tuesday, March 30, 2010

वाट....

माडांची मांदियाळी,

विसावलो तरुतळीं,

पायांखाली हुळहुळे,

मऊ वाळू सोनसळी...


वेणीवर माळलेली,

मऊ-मख्मली अबोली,

झळ लागता उन्हाळी,

जरा-जराशी सुकली...


भाळावरती सखीच्या,

नक्षी थेंबांची दाटली,

गडे, धराया सावली,

एक झावळी झुकली...


स्वप्नाचिया मृगजळीं,

लाट उठली, विरली,

वाट माडांच्या मधली,

माडांतच हरवली.....

Monday, March 29, 2010

वाट....

खाचा-खळग्यांची वाट,

एकटीच चालले,

जमीन जास्त भेगाळलेली,

की त्याहून जास्त, पावले?.....

गारूड...

कुंकवाच्या चिरीखाली,

तुझ्या भाळीचं गोंदण,

जेव्हां मधुर हासतं,

तेव्हां माझ्या मनावर

तुझं गारूड पडतं...



तुझं सोन्याचं कंकण,

गर्द हिरव्या चुड्याशी,

जेव्हां गुंजन करतं,

तेव्हां माझ्या मनावर

तुझं गारूड पडतं...



तुझ्या डोळ्यातलं तेज,

नथीतल्या मोतियाशी,

जेव्हां स्पर्धा गं करतं,

तेव्हां माझ्या मनावर

तुझं गारूड पडतं...



तुझी शांत नेत्रज्योत,

जेव्हां निरांजनासवें,

सखे, तेवे गं निवांत,

तेव्हां माझ्या मनावर

तुझं गारूड पडतं.....

Saturday, March 20, 2010

सखे...

रुसुनी तू गेलीस तेव्हां, जलधार कोसळत होती,

अपमानित नेत्रीं माझ्या, आसवेही तरळत होती..



दूर दूर रस्त्यावरती झाडेही निथळत होती,

अन स्वप्नांची रांगोळी, पाण्यात विरघळत होती....




अन तीव्र लहर वाऱ्याची छेडिता पारिजाताला,

शाल शुभ्र, खांद्यावरुनी, हळुवार ओघळत होती....




घनगर्द, सांवळ्या मेघां, बिजलीने कातरताना,

वेदनाच जणू मेघाची, जलरुपीं कोसळत होती....




माझ्याही मनांतरी सखये, अशी स्मृतिवृष्टी होताना,

दूरात मनाच्या क्षितिजीं, चंद्रकोर उजळत होती....