Tuesday, October 30, 2007

इथंच..

आपण दोघे एकाच बोटीतले प्रवासी,
उलटलेल्‍या बोटीतले..
किनार्‍यापासून दूर येऊन उलटली बोट..
काही किनारे आपण मागे सोडले,
काही किनार्‍यांनी आपल्‍याला सोडून दिलेलं..
आता परत किनार्‍याकडे जायचं?
की, एकमेकांचे हात धरून, इथंच.........?

Monday, October 08, 2007

सावली..

मुखवट्‍याआडची तुझी मुद्रा, जगाला कुठे दिसली?
तू मोठा शहाणा, मोठी तुझी सावली,
तुझ्‍या सावलीत माझी प्रतिमाच हरवली...

उसळून बाहेर पडले, तुझ्‍या सावलीतून,
तेव्‍हाच खर्‍या अर्थी समजून चुकले,
तुझ्‍या सावलीतच किती जास्‍त होरपळले...

होरपळायचेच जर आहे तर,राहीन उन्‍हातच,
सोसेन चटके,पण, माझी मीच होईन सावली.
माझा रस्‍ता दाखवेल मला माझ्‍या हातातली दिवली...

Sunday, October 07, 2007

दीप..

टाचका संसार,
जसा बंगला पत्त्‍याचा,
त्‍याला आडोसा
मायेच्‍या पदराचा..

हाताला चटका,
सये सोशीन तव्‍याचा,
परी जिवाचा चटका
सोसवेना..

वैशाखाचा दाह,
झरा आटे विहीरीचा,
परी राखीन ओलावा
अंतरीचा..

काळोखाची वाट,
राती अंधार माईना,
परी दीप मालवो ना
विश्‍वासाचा..

Thursday, October 04, 2007

लेक माझी..

पहाटेच्‍या रानवार्‍या,
किती उधम करिशी,
त्‍यापरीस धर वाट,
माझ्‍या लेकीच्‍या घराची..
अंगणात पारिजात,
फुललासे पानानिशी,
देते सुगंध जरासा,
तिच्‍या घरला नेण्‍यासी..
नेई जपून, जपून,
ठेव तिच्‍या खिडकीशी,
बघ हळूच,हळूच,
लेक माझी आहे कशी..
जा रे हळू तिच्‍यापाशी,
तिला सांग माझे गूज,
दे रे सुगंध मायेचा,
हातांनी,मोरपिशी..
म्‍हण तिला,सुखी ऐस,
कर सुखी ग सार्‍यांसी,
आणि माझ्‍या ग सयेने,
नको होऊ कासाविशी..
तिच्‍या एका स्‍मरणाने,
मनी लकेर हास्‍याची,
वाणी मधुर तियेची,
रुणझुणे कानापाशी..
तिच्‍या मनाच्‍या कुपीत,
लयलूट सुगंधाची,
तिच्‍या कीर्तीचा सुगंध
आण मला उत्तरासी....

Monday, October 01, 2007

पाचोळा...

दीप तेवे वृंदावनी,
सांज दाटली,दाटली,
आता येई परतुनी,
किती पाहू रे वाटुली?..

पाचोळा...

मेंदीभरल्‍या पाऊलीं,
पाणंदीला चढे लाली,
भाव-भावनांची नक्षी,
तीत खुबीने गुंफली...

पाचोळा...

जीवनाच्‍या आडावरी,
घागरींचे येणे-जाणे,
हिंदळती कटीवरी,
सुखदु:खाचे उखाणे...

पाचोळा...

सुर्यदेवाच्‍या साथीने,
प्रकाशाचे येणे-जाणे,
सुखदु:खाचा हा खेळ,
उन-सावलीच्‍या रुपाने...