Thursday, November 22, 2007

पाखरा....

पारिजाताच्‍या फांदीला,
खोपा इवला टांगला,
घेई मंद मंद झोके,
सुगंधाच्‍या संगतीला....

मऊ केशरी दुलई,
पांघरून ग उबेला,
इवलासा जीव,
थाटामध्‍ये पहुडला....

भुर्रकन उडे माय,
कधी कोठीत,अंगणात,
तान्‍हुल्‍याची उष्‍टी शिते,
घाली पिलाच्‍या चोचीत....

इशी,मम्‍म,गाई,
सारे सांभाळिते माय,
बसे चिमणा दारात,
राखणीला....

मायेच्‍या सावलीत,
दोघे वाढले झोकात,
पुत्र घरकुलात,
आणि पाखरू खोप्‍यात....

विद्‌येसाठी पुत्र,
जाई दूर दूरदेशी,
तूही जाई रे पाखरा,
राही त्‍याच्‍या वळचणीशी....

रिझवी त्‍याच्‍या मना,
तुझ्‍या मंजुळ बोलांनी,
जननी,जन्‍मभूमी,
यांच्‍या सांग आठवणी....

धनवंत,विद्‌यावंत,
पुत्र येईल माघारा,
तुही येई रे पाखरा,
देईन मोतियाचा चारा....

Wednesday, November 14, 2007

दिवाळी....

माझ्‍या मनाच्‍या आकाशी,
चंद्रतारे गोंदलेले,
फटफटली पुरब,
जरी दीप विझलेले....

दीप जरी विझलेले,
कुठे अंधार राहिला?
सुमंगल शुक्रतारा,
क्षितिजी ग उगवला....

दिवसाच्‍या स्‍वागताला,
प्रकाशली ग कमळे,
रंग आशेचे हासरे,
अल्‍पनेत झिरपले....

सात ठिपके सुखाचे,
सात ठिपके दु:खाचे,
करी आड संकटाला,
स्‍वस्‍तिचिन्‍ह मंगलाचे....

दारी आकाशकंदिल,
झगमगले तेजात,
कुंकुमाच्‍या पावलांनी,
आली दिवाळी हासत....

दारी सनईचे सूर,
रुणझुणले मोदात,
सवें सखी सुवासिनी,
करी स्‍वागत सस्‍मित......