Friday, June 13, 2008

सखि..

ओळखीचा सूरही का बेसुरा भासे मला?
सूर कंठातीलही सोडून गेलासे मला..
आठवेना शब्‍दही समजावण्‍या तुजला सखे,
गे मूक झाले नेत्र अन्‌, अश्रूच केवळ बोलके..

बघ, वळेसर बकुळीचे गुंफीत बसलो मी सखे,
अन्‌, कल्‍पनेतच माळिले केसांत तुझिया लाडके..
पाहुनी तव लाजणे, गे स्‍वप्‍न झाले बोलके,
अन्‌, वाढवेळी भान येतां, धावलो तुजप्रति सखे..

परि वेळ टळली भेटीची, हे चांदणे झाले फिके,
अन्‌, भोवताली पसरले बघ गर्द रुसव्‍याचे धुके..
सोड ना रुसवा प्रिये, करु तरी किती मी आर्जवे?
हे दंव नव्‍हे पात्‍यांवरी सखि, सांडली मम आसवे..

मग, टाकुनी रुसवा प्रिया अशी मंद गाली हासली,
शब्‍दां-सुरांच्‍या संगतीने पाखरेही थिरकली..
एक कविता प्रीतीची, मग उमलली कलिकांसवे,
अन्‌ दंवाच्‍या संगती, गेली विरोनी आसवे....

Saturday, June 07, 2008

चंद्र...

त्‍या ढळत्‍या रात्री, चंद्र हासला मजला,
हा वेडा झाला, वेडा झाला, वदला....

किती प्रसन्‍न वदनें, मधुर भाषणें,
मोहुनी सखिने मजला,
संकेत भेटीचा दिला प्रियेने,
कार्तिक पुनवेला..
मी प्राजक्‍ताचा मृदू गालिचा,
तिजसाठी अंथरला,
परि ना आली ती....
परि ना आली ती निष्‍ठुर बाला,
वचन देउनही मजला....

रुसलो मी, रागेजलो,
फुले ती उधळित मग बसलो..
अन्‌, चंद्राच्‍या कुत्‍सित हसण्‍याला,
निमित्त की झालो....
हसण्‍याने मुखचंद्र तयाचा लाल की हो झाला,
सूर्यास पाहुनी प्राचीवरती, मावळून गेला....