Saturday, July 29, 2006

रे मना....

माझ्‍या मना सावर
हा उंच जाणारा झूला,
पुढच्‍या क्षणी खाली येताना,
भोवळ येईल ना मला...

अवखळपणे धावतोयस
या ओढाळ पाउलवाटेवरती,
नजर तुझी नक्षत्रमण्‍यांवर,
पण,काटे पायांखालती...

थांब जरासा,हात धर माझा,
सावर तुझा तोल,
जरासाही ढळलास तर,
दुनिया लावेल बोल........

Friday, July 28, 2006

पाचोळा

तू सांगितल्‍यावेळीच,अचूक पाउल टाकलं रंगभूमीवर..
रंगवत गेले वाट्‍याला आलेले सारे,हातात तो तो ब्रश घेउन..
त्‍या प्रत्‍येक वेळी,न विसरता उच्‍चारत गेले,तू पढवलेले संवाद सारे..
सभागृहाचे रंजन केले,अभिनय केले,
कुडीला जमतील ते सारे,खूप आतून,उत्‍कटतेने..
आता,एक्‍झिटही तूच ठरवलेली..
पण,एकच उत्‍सुकता आहे,
तू एखादी तरी पसंतीची टाळी वाजवशील का रे??

पाचोळा

निवांत रात्री, जागणारा चंद्र,
आणि जोडीला त्‍याचं चांदणं,
हरवलेली मी मात्र,
मनातल्‍या सावल्‍यांच्‍या साक्षीनं.....

वाराही माझ्‍या थार्‍याला नाही,
चित्त आज माझे थार्‍यावर नाही,
माझ्‍या मनाच्‍या वळचणीला
आज एकही पाखरु नाही......

पाखराच्‍या नावावरुन आठवतोय
माझा बालपणीचा गाव,
आयुष्‍याच्‍या वावटळीत हरवलेलं,
माझ्‍या गावाचं नाव......

नावात काय आहे रे,
कोणी काहीही ठेवतोय..
माझ्‍या नावाचाही,
आज ठाव हरवतोय.......