Thursday, February 08, 2007

पाचोळा

स्‍मरणाच्‍या फुलांनी
भरली ओंजळ,
आता मात्र पानगळ....

Wednesday, February 07, 2007

विराणी

ओढ लागलीसे
तुझ्‍या सगुण रुपाची,
क्षुद्र मी अज्ञानी,
निर्गुणी.........

तुझ्‍या सगुण रुपाची
अशी मोहिनी मानसी,
चित्त अहर्निशी,
तुझे ठायी.........

चित्त अहर्निशी
तुझ्‍यालागी झुरे,
किती येरझारे,
जन्‍मोजन्‍मी..........

जन्‍मजन्‍मांतरी
तुझ्‍या भेटीची असोशी,
कासया श्रीहरी
कासाविशी..........

कसा रे श्रीहरी,
जीव झालासे मंथर,
एका श्‍वासाचे अंतर
का न मिटे??.........

न मिटे हा जीव,
न मिटे यातना,
का न ये करुणा
तुजलागी??...........

तुजलागी आण
माझिया जिवाची,
सोडवी मायेची
निरगाठ............

तन मन धन,
तुजवरी उधळोनी,
झाले मी उन्‍मनी
विरहिणी............

Tuesday, February 06, 2007

पाचोळा

उतरणीवरचा सूर्य क्षितिजाआड झेपावला,
कमलिनीच्‍या मिठीमध्‍ये भुंगा गुरफटला...
सोड सोड कमलिनी,जाऊ दे ना मला,
भुंग्‍याचा गुंजारव मिठीतच विरला...
सुप्रभाती पूर्व दिशा केशराने माखली,
क्षितिजावर रविराजाची स्‍वारी उगवली...
रविकराच्‍या स्‍पर्शाने कमलिनी मोहरली,
पाकळी नि पाकळी आनंदाने उमलली...
कमलिनीच्‍या मिठीतून भुंगा अलगद सुटला,
झोपेतून जागला,तो गुणगुणायलाच लागला...
अमृताच्‍या गोडव्‍याने झालो वेडापिसा,
कमलिनीच्‍या मिठीतून सुटलो कसाबसा...
भुंग्‍याची गुणगुण कमलिनीच्‍या कानी गेली,
रातीचे स्‍वप्‍न, ती पुन्‍हा आठवू लागली...
कोण आला,कोण गेला,तिच्‍या नाही गावी,
कमलिनीच्‍या मनी-मानसी राज्‍य करी रवी...