Tuesday, March 27, 2007

अळवावरचे पाणी.....

प्रीती हे अळवावरचे पाणी
वेड्‍या अळवावरचे पाणी......

भुलशिल जरि त्‍याच्‍या तेजाने
धरू पाहशिल प्रेमभराने
किंचितशा परि तव स्‍पर्शाने
जाइल ओघळुनी,
अश्रुपरि धरणीलागोनी..
प्रीती हे अळवावरचे पाणी....

निरभ्र,सुंदर,रम्‍य नभांगणी
येती दीपकळ्‍या उमलोनी
एखादीवरि नजर खिळवुनी
रमशिल जर स्‍वप्‍नी,
क्षणार्धात ती येइल भूवरी
पत्‍थर होवोनी..
प्रीती हे अळवावरचे पाणी.....

Thursday, March 15, 2007

संवाद...

सूत्रधार मला म्‍हणाला-
चल हं लवकर,आता रंगभूमीवर तुझ्‍या प्रवेशाची वेळ झाली.
कपडेपटात तुझ्‍यासाठी कपडे ठेवले आहेत,ते घाल..
मी बघितले,तर तिथे दोनच कापडाचे तुकडे होते.
मी म्‍हटले-हे दोन, एवढेच??
सूत्रधार म्‍हणाला- हो,तेवढेच घाल.एक छातीला,एक कमरेला...
हल्‍ली एवढेच घालतात....
या आधीच्‍या प्रवेशात घातले होतेस की,वेगवेगळे कपडे..
कधी वल्‍कले,कधी पानेफुले....
एकदा,राणी एलिझाबेथचा झगा घातला होतास..
तीन दासी होत्‍या,त्‍याचा घोळ धरायला......
पेशवाईत शालू,शेले,दागिने,घालून वाकली होतीस......
हे मागच्‍या प्रवेशातील लाल आलवण....
आयुष्‍यभर...sorry...प्रवेशभर पांघरलंस......
या वेळी,हे इतकंच घाल....
मग मी ते लावून/लेवून रंगभूमीकडे निघाले....
तो धावत माझ्‍या मागे आला,नि म्‍हणाला-अगं,हा रुमाल!!
हा विसरुन कसं चालेल??
-घाल वल्‍कले,नाहीतर पानेफुले..
-झगा,आलवण,नाहीतर शालूशेले..
पण,डोळे पुसायला रुमाल तर लागेलच!!
मला आठवला,पांचालीला साड्‍या पुरविणारा श्रीकृष्‍ण....
तिच्‍यापासून माझ्‍यापर्यंत,सगळ्‍यांचे डोळे ओले.....
मी म्‍हंटलं- तर मग कोरडे ठक्‍क का करीत नाहीस,आमचे डोळे??
मी बघितले,तर तो निश्‍चल..त्‍याचे डोळे सजल...
मग,मी त्‍याला डोळे पुसायला रुमाल दिला,
आणि रंगभूमीकडे निघाले...कोरड्‍या डोळ्‍यांनी!!

Wednesday, March 14, 2007

पाचोळा

कसली ओढ,कुठली आस,
समजत नाही..
कुठली दिशा,कुठली साद,
उमगत नाही..
संसाराचा पसारा काही
आवरत नाही..
पायाखाली अवघड वाट,
सरत नाही....

Tuesday, March 13, 2007

मैत्र..

मंतरलेल्‍या वनात,
आरसपानी तळ्‍यात..
अलवार उमलणारं,
तुझं माझं मैत्र....

तुझं हळवं तरुणपण,
क्षणोक्षणी शहाणं होत जाणारं..
माझं शहाणं वय,
क्षणोक्षणी हळवं होत जाणारं....

मीच मी...

माझ्‍या श्‍वासाच्‍या लयीत
वारे वाहती सर्वत्र,
नजरेच्‍या इशार्‍याने,
होई दिवस वा रात्र.
मन उचंबळुनी येता,
येती पावसाच्‍या सरी,
मीच या पृथ्‍वीवरी राज्‍य करी,
अधिराज्‍य करी.....

सुख झंकारता मनी
नवे धुमारे फुटती,
ओल्‍या मातीतून नव्‍या
इच्‍छा,आशा अंकुरती.
तृप्‍त हुंकाराने माझ्‍या,
नादे कृष्‍णाची बासरी.
मीच या पृथ्‍वीवरी राज्‍य करी,
अधिराज्‍य करी.....

Sunday, March 11, 2007

पाचोळा

चमकदार डोळ्‍यात
काजळाची रेघ,
निळ्‍यासावळ्‍या ढगावर
विजेची रेघ.......

पाचोळा

काळीकुट्‍ट सावलीही,
विश्‍वास देते की,
मागे प्रकाश झगमगतोय..

रंग

सत्‍याच्‍या प्रकाशात,
गोरा रंग,
आतून कुजलेला....

सत्‍याच्‍या प्रकाशात,
काळा रंग,
उमलून झळाळलेला....