Wednesday, April 23, 2008

पावसा...

पावसा, धावशी,
वार्‍याच्या मागूनी,
पागोळी भिऊनी,
सोडते वळचणी..

मोत्यांचे शिंपण,
आभाळा मधुनी,
धारांच्या धाग्यात,
घेते मी गुंफूनी..

कडाडे बिजली,
ढगांची आरोळी,
पावसा, सांभाळी,
घरी मी एकली..

सखा ना जवळी,
घर चंद्रमौळी,
निवांत झोपली,
नाजूकशी बाळी..

सख्या रे, पावसा,
लाडक्या, राजसा,
दंगा नको असा,
येई हलकासा..

मग सुखावून,
सोनुली जागेल,
तुलाही देईल,
पापा हलकासा....

Saturday, April 19, 2008

कोण मोठा?...

मन मोहून गेलं,
जेव्‍हां बघितलं,
मधुर, सुगंधी,
गुलाबी कमल,
गोल, हिरव्‍या पानांची,
भोवती मखमल,
अन्‌ तळाशी मात्र..
हीन चिखल, दलदल....

गुलाबाचंही असंच..
मस्‍त, सुगंधी,
फुलांत श्रेष्‍ठ,मोठा,
अन्‌, पानांआड दडलेला,
अहंकाराचा काटा..

कोण महत्‍वाचा?
कोण मोठा?
कमल आणि गुलाब?
की, चिखल आणि काटा?....

पाऊस...

वार्‍याचा धिंगाणा,
पाऊस हमामा,
सांवळ्‍या ढगांशी,
बिजलीचा झिम्‍मा..

झरते पागोळ,
उखणली माती,
गारांची रांगोळी,
तुळशीभोवती..

विखरली फुले,
पारिजाताखाली,
देठांची ग लाली,
मातीत सांडली..

नदीला येतसे,
पूर अनावर,
सागरभेटीचं
डोळ्‍यांत सपान..

वारा हा भरारा,
उडे सैरावैरा,
पाचोळा गोलात,
फिरे गरागरा..

प्रवाहा संगती,
कागदाच्‍या बोटी,
घेऊन लेकींना,
निघाल्‍या माहेरा....

Friday, April 18, 2008

चंद्र...

रोजच येतसे,
चंद्र अलवार,
उधळीत सारे,
चांदण वैभव..

तसाच झरतो,
चांदण्‍याचा सडा,
प्राजक्‍ताच्‍या गंधें,
भारीत विभव..

आडून डोकावे,
जादुई नजर,
सावळ्‍या ढगाला,
चंदेरी किनार..

पानांची सतार,
कोवळा थरार,
मोहक,मंथर,
सुगंध लहर..

साजिरा,सुंदर,
आठवांचा पक्षी,
घेतसे भरारी,
पर्णराजीतून..

आळवितो धुन,
मंजुळ,मधुर,
कान्‍हयाची हाक,
जणू वंशीतून....

Thursday, April 17, 2008

प्रवाहो...

आयुष्‍या कडून,
मृत्‍यूच्‍या दिशेने,
जनांचा प्रवाहो,
चाललासे..

जड,सुखी,दु:खी,
शरीराचे ओझे,
पाठीवरी येथे,
प्रत्‍येकाच्‍या..

श्रांत,क्‍लांत पदीं,
चालतात वाट,
आयुष्‍याचा मोह,
सुटेचि ना..

खरे तेज शांती,
मृत्‍यूचिया पार,
चिरंतन सत्‍य,
कळेचि ना..

उत्‍कंठा तेजाची,
जिवाच्‍या मुक्‍तीची,
आस चिरंतन,
मिटेचि ना..

पायांखाली वाट,
खाचा-खळग्‍यांची,
किती,किती चालू?
सरेचि ना....