Monday, March 24, 2008

निखारा...

निखारा विझत चाललेला,
भसाभसा धूर सोडतेला,
छातीत भरून जीव घुसमटला;
मी फुंकणीने सगळा धूर त्‍याच्‍यावरच फुंकला,
तर परत निखारा चेतला;
त्‍यातून मग नाजूकशी ज्‍वाला निघाली,
अन्‌ तिच्‍यावर भाताची तपेली शिजली.
तवा लालेलाल तापला..
बोटांना चटका बसला,
पण भाकरीही भाजल्‍या..
मीही अशीच जन्‍माला आले, जळता निखारा..
आईने शिक्षणाचे स्‍फुल्‍लिंग चेतवले.
वाढतेलं वय, पदरात निखारा..
बापाने उजवून टाकले..
या चुलीतून त्‍या चुलीत घातला निखारा..
दोन वर्सात दोन निखारे घातले जन्‍माला..
सासूने नोकरीला अटकाव केला,
परत चेतला निखारा..
भाजीचा व्‍यवसाय सुरू केला;
माझा स्‍वाभिमान नवर्‍याच्‍या डोळ्‍यात खुपला,
त्‍याच्‍या आळशीपणाने नोकरीवर घाला आला;
हळूहळू जवळ केले बाटलीला..
परत घुसमट, परत फुंकणी,
परत निखारा चेतला;
एक वेळा, दोन वेळा, चार वेळा,
मी फोडून टाकले बाटलीला..
परत घुसमट, परत फुंकणी,
गोळा केल्‍या बाराजणी,
घेऊन झारे आणि झाडणी,
दारुड्‍या नवर्‍यांची केली फोडणी..
आता कंबर कसली आहे,
आता मागे हटणार नाही,
गावात एकही गुत्ता,
आता शिल्‍लक ठेवणार नाही;
चेतलेला निखारा,
आता जाळल्‍याशिवाय राहणार नाही......

Monday, March 10, 2008

धन्‍यवाद...

९ मार्च २००८ च्‍या लोकसत्ता, रविवार वृत्तांत 'मर्‍हाटी नेट-भेट' मध्‍ये,
निवडक वाचनीय blog म्‍हणून उल्‍लेखण्‍यात आल्‍याबद्‍दल धन्‍यवाद..
..सुषमा करंदीकर

Saturday, March 08, 2008

जाव दे ना गं मला साळंला...

जाऊ दे ना ग मला साळंला,आई, जाऊ दे ना ग मला साळंला ।।
सकाळधरुन, तू बेगिनं आवरुन, निघून गेलीस कामाला,
वेणीफणी करुन, नि युनिफार्म घालुन मी बघतेय तुज्‍या वाटंला,
कधी येशील तू,आन्‌ कधी मी जाईन,उशीरच होऊन गेला,
शाळेला वेळेवर जान्‍याचा धडा, मी पहिल्‍याच दिवशी चुकविला।।
वेणीफणी करुन....
भांडीकुंडी सारी, बग घासुन-पुसुन, मी ठेवुन दिलित जागंला,
कपडे बी सगळे धुवूनशान अन्‌ लावुन दिलेत दांडीला,
हीरीचं पाणी वढूनशान मी हंडा बी भरुन ठेवला
झाडलोट करून,रांगोळी रेखून, पाणी घातलं तुळशीला।।
वेणीफणी करुन....
संभाळल्‍या बाळाच्‍या दुदाच्‍या वेळा, नि न्‍हाऊ बी घातलंय त्‍येला,
बनवला नाश्‍टा दादासाठी, आन्‌ बाबाला च्‍या बी क्‍येला,
होत्‍या त्‍या पिठाच्‍या चार-पाच भाकरी, नि झुनका बी करुन ठेवला,
नि कालचीच भाकरी नि गुळाचा खडा मी घेतलाय मधल्‍या सुट्‍टीला।।
वेणीफणी करुन....
माझी शाळेला जायची गडबड बघुन, बघ बाबा बी वरडायला लागला,
म्‍हणे, घरातली कामं करायची कुनी, आन्‌ संभाळंल कोन पोरान्‍ला?
लई जाले शिक्‍शान,आन्‌ लई जाली साळा,आता उजवूनच टाकतो तुला,
आई, करीन ग सगळी घरातली कामं,पण शाळा नाई सोडायची मजला।।
वेणीफणी करुन....
जवा दारू पिऊन बाबा येतो घरी, तवा लई भ्‍याव वाटतंय मजला,
कसं ग करशील,कसं संभाळशील, तुजी काळजी बी वाटतीय मजला,
चंदू, बाळा दोघे ग लाहान अजून, आन्‌ चालू हाय दादाची शाळा,
ठेव भरवसा ग, आई शिकीव मला, होईन तुज्‍याच ग आधाराला।।
वेणीफणी करुन....
माये, आई तुजी आन्‌ सासू तुजी, कशा शेतकामाने झिजल्‍या,
आन्‌ तुजा बी जीव, शिक्‍शानाच्‍या विना, आये घरकामाने पिचला,
घाईघाईने लगिन नको मला, आई, साळेत जाऊ दे मजला,
शिकून-सवरून,मोटी शाणी होवून बग मिळवीन सन्‍मानाला ।।
वेणीफणी करुन, नि युनिफार्म घालुन मी बगतेय तुज्‍या वाटंला।।

Friday, March 07, 2008

पाचोळा...

झिजलेल्‍या वस्‍त्राला,
ठिगळ लावता येईल..
पण....
विरलेल्‍या नात्‍यांना,
फाटलेल्‍या आभाळाला?
भेगाळलेल्‍या जमिनीला?
कसं रे?....

पारिजात...

गाढ साखरझोपेत,
वार्‍याच्‍या झुळकेबरोबर,
मोहक सुगंधाची चाहूल लागली..
सुगंधाचा मागोवा घेत,
बाहेर अंगणात जाऊन पाहिले तर,
शुभ्र, रेशमी शाल पांघरून,
पारिजात ध्‍यानस्‍थ बसलेला..
त्‍याच गंधलहरींवर झोके घेत,
परत निद्रावश झाले;
जणू सुखस्‍वप्‍न पाहिले....

सकाळी जाग आल्‍यावर,
प्रथम पारिजात आठवला..
अंगणात जाऊन पाहिले तर,
शुभ्र, रेशमी शाल, ओघळलेली..
सुगंध, सार्‍या वातावरणात विरघळलेला;
आणि पारिजात, तसाच ध्‍यानस्‍थ बसलेला..
बाकी फक्‍त निर्माल्‍य आणि पाचोळा..
सुख आणि दु:ख, दोन्‍ही फक्‍त मला?....

Monday, March 03, 2008

मृगजळ...

मृगजळामागे धावून धावून,
पावले गेली शिणून,
हाती काहीच न लागता,
यौवन गेले सरून..

थकून-भागून गेली काया,
घेरून आल्‍या संध्‍याछाया,
तुझ्‍या भेटीची सदया,
आस लागली हृदया..

मनी-मानसी रे ध्‍यास,
तुझ्‍या दर्शनाची आस,
जीव झाला कासावीस,
तूच माझा होई श्‍वास..

पुरे झाली आता,
काम-क्रोधाची धुमाळी,
आयुष्‍याच्‍या संध्‍याकाळी,
येई,येई रे,वनमाळी....

Sunday, March 02, 2008

सख्‍या...

हात तव हातात धरुनी, चालले मी कुठवरी,
ज्ञात ना व्‍यवहार इथले, ओळखीची न ही नगरी..

नागमोडी वाट हिरवी, नदीकिनार्‍याशी वळे,
अन्‌ उमटलेली तीवरी, मम मेंदीभरली पाउले..
वनी,उपवनी येथ फुलली, विविध रंगांची फुले,
आणि पुष्‍करिणीत अवतरले, सुरम्‍यचि नभ निळे..

सोनसळी रे किरण रविचे, अरुणरंगी रंगले,
पारिजाताच्‍या तळी, केशर सुगंधी सांडले..
कोकिळेच्‍या पंचमाने, नीज अवनीची खुले,
अन्‌ गर्भरेशमी पदर, वार्‍यासंगतीने सळसळे..

कमलपाशी गुंतलेले, भृंग होती मोकळे,
अन्‌ गुणगुणत गीते नवी, मधुप्राशनी बघ दंगले..
ऊन मध्‍यान्‍हातले, हळवे मुलायम भासले,
प्रेम विश्‍वासाचिया रे, संगतीने कोवळे....

पाखरांच्‍या कलरवें, मी नेत्र जेव्‍हां उघडिले,
कोण तू,अन्‌ कुठली नगरी? स्‍वप्‍न केवळ पाहिले..
एकलीच मी, तुडविते रे वास्‍तवाची जंगले..
स्‍वप्‍न ठेवुनी लोचनी, अन्‌ माळुनी अग्‍निफुले....

Saturday, March 01, 2008

पाचोळा...

लढण्‍यासाठी,रडण्‍यासाठी,
आणि तिरडीसाठीही,
लागतोच की....खांदा.

पाचोळा...

काट्‍याने निघतो काटा,
विषावर उतारा विषाचा,
तर,द्‍वेषाच्‍या पाण्‍याने द्‍वेष धुता येईल?...

पाचोळा...

जगू शकतेय तुझ्‍याशिवाय,
पण मरणार मात्र नाही,
तुला पाहिल्‍याशिवाय....